पुणे - राज्य शासनाने आत्तापर्यंत कोरोनासाठी एकही पॅकेज जाहीर केले नाही. ज्या नागरिकांचे हातावर पोट आहे, त्यांच्यासाठी काही तरी मदत द्या म्हणून भाजपा सातत्याने मागणी करत आहे. दुकान मालक, पथारीवाले, रिक्षा चालक, बाराबलुतेदार यांच्याविषयी बोलण्यासाठी राज्यशासन तयार नाही. याउलट केंद्र सरकारने राज्याला आत्तापर्यंत रेल्वेचे भाडे, रेशन आणि वेगवेगळ्या पॅकेजेच्या रुपात 2 हजार 800 कोटी रुपये दिल्याचा दावा खासदार गिरीश बापट यांनी केला आहे.
कोरोनाच्या लढाईसाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी आत्तापर्यंत 2 हजार 800 कोटी दिले पुण्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा करण्यासाठी खासदार गिरीश बापट यांच्यासह पुण्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आज महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर बापटांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कोरोनाच्या लढाईत महानगरपालिका स्तरावर सर्वात जास्त निधी पुणे महापालिकेने खर्च केला आहे. महापालिकेत सत्ता कोणाची आहे हा महत्त्वाचा मुद्दा नाही, तर पुणेकर हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे आम्ही सुरुवातीपासूनच प्रशासनाशी चर्चा करत आहोत. कोरोनाबाधित रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा कशा मिळतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोरोनाचा प्रत्येक रूग्ण बरा झाला पाहिजे. त्याला औषधोपचार व्यवस्थित मिळाले पाहिजेत. आम्हाला यात कुठलेही राजकारण करायचे नाही, असे बापट यांनी सांगितले.
खासदारांचा दोन वर्षांचा निधी कोरोनासाठी -
केंद्र सरकारने आजवर पुणे महानगरपालिकेला खूप निधी दिला आहे. अजूनही निधी आणला जाईल. भाजपाच्या आमदार, खासदारांनी कोरोनासाठी पैसे दिले आहेत. खासदार म्हणून दोन वर्षांचा पाच कोटीचा निधी केवळ कोरोनावरच खर्च होणार असल्याचेही बापट यांनी यावेळी सांगितले.