पुणे- पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील काळवाडी येथे पाळीव श्वानाला बिबट्याच्या तावडीतून वाचविण्यासाठी मालकाने थेट बिबट्याचा पाठलाग केला. हा थरार सीसीटीव्हीत ही कैद झाला आहे. मदन काकडे, असे धाडसी मालकाचे नाव आहे. दुर्दैवाने मालक स्वतःच्या श्वान वाचवू शकले नाहीत. हा प्रकार मंगळवारी (दि. 17 मे) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला ( Leopard Hunt a Dog ) आहे.
आजूबाजूला शेती असलेल्या ठिकाणी मदन काकडे यांचे निवासस्थान आहे. त्यांच्याकडे सहा वर्षांपासून पाळलेला राजा नावाचा श्वान आहे. पहाटे अचानक उसातून दबक्या पावलाने बिबट्याने घराच्या अंगणात प्रवेश केला. श्वानाची व बिबट्याची नजरानजर होताच त्यांच्यात झटापट सुरू झाली. बिबट्याने श्वानाची मान जबड्यात पकडून धरली. ओरडण्याचा आवाज ऐकून मदन काकडे धावत घराबाहेर आले. कशाचीही पर्वा न करता त्यांनी श्वानाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. बिबट्याने श्वानाला घेऊन ऊसात पळ काढला. काकडे त्याच्यामागे धावत गेले. मात्र, बिबट्याने चपळाई दाखवत धूम ठोकली. त्यामुळे त्यांच्या लाडक्या राजाचा जीव ते वाचवू शकले नाही. हे थरारनाट्य घराबाहेरील सीसीटीव्हीत कैद झाले आहे.