पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यातून पकडून दिलेले ते तीनही नागरिक पश्चिम बंगाल आणि उत्तरप्रदेशचे नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आता या नागरिकांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पुणे पोलिसांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचे सांगितले. या सर्व प्रकाराने संपूर्ण कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला असून याविरोधात आता कायदेशीर लढणार असल्याचा निश्चय या नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी पुणे पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे रोशन शेख, बाख्ती सरदार आणि दिलशाद हसन यांच्या घरी शनिवारी सकाळीच मनसेचे कार्यकर्ते पोहोचले. त्यांनी तिघांना बांगलादेशी असल्याचे सांगून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, पोलिसांनी त्यांची कागदपत्रे तपासल्यानंतर हे तिघेही पश्चिम बंगाल आणि उत्तरप्रदेशचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले.