बारामती (पुणे) - अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्याचे पाऊल बारामती नगरपालिकेने उचलले आहे. नोटीस दिल्यानंतरही अनधिकृत बांधकाम काढून न टाकल्याप्रकरणी सम्राट रमेश शहा (रा. महावीर पथ, बारामती) यांच्याविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहा यांना पहिली नोटीस
नगरपालिकेचे सहायक नगररचनाकार रोहित राजेंद्र पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार शहा यांच्या विरोधात पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ ते कलम ५२ व ५४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार सम्राट शहा यांना बारामती नगरपालिकेने सुधारित बांधकाम परवान्याच्या अन्वये ८ नोव्हेंबर २०११ रोजी परवानगी दिली होती. परंतु, हे बांधकाम करणाऱ्या शहा यांनी मंजुरी न घेताच वाढीव बांधकाम केल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे पालिकेने त्यांना २८ ऑगस्ट २०२० रोजी नोटीस बजावली होती. या नोटिशीमध्ये मंजूर बांधकाम व्यतिरिक्त केलेले वाढीव बांधकाम काढून टाकावे, अशी सूचनाही करण्यात आली होती.