पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात एका एटीएममध्ये छुपा कॅमेरा आढळून आला आहे. तसेच स्कीमरला चिप लावलेली सापडली आहे. छुप्या कॅमेऱ्यात पिन नंबर कैद व्हायचा, तर एटीएम कार्डची सर्व माहिती चिपमध्ये संग्रहित होत असे, अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली. हा कॅमेरा कधी लावला हे समजू शकले नाही.
पिंपळे गुरवमधील आयसीआयसीआय एटीएममध्ये आढळला छुपा कॅमेरा पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आहे. यात स्कीमरच्या आत चिप बसवण्यात आली होती. तसेच एटीएमचा पिन टाकण्याच्यावर एक छुपा कॅमरा बसवला होता. सांगवी पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी शिमोन चांदेकर यांनी घटनास्थळी जाऊन सविस्तर माहिती घेतली.
दरम्यान, या प्रकाराला नायझेरियन फ्रॉड असे म्हटले जाते, अशी माहिती चांदेकर यांनी दिली आहे. तसेच किती जणांची फसवणूक झाली आहे, हे अद्याप समजू शकले नाही. शहरात असे अनेक प्रकार घडतात, मात्र नागरिक सतर्क राहत असल्याचे दिसत नाही. दरम्यान, एटीएममध्ये गेल्यानंतर छुपा कॅमेरा किंवा आपली फसवणूक तर होत नाही ना याची खात्री करायला हवी, अन्यथा काही मिनिटात लाखो रुपये बँकेच्या खात्यातून कमी होऊ शकतात हे नक्की आहे.
शहरातील अनेक एटीएम हे रामभरोसे आहेत, एटीएम असलेल्या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याचे पाहायला मिळत आहे. याचा फायदा अज्ञात सायबर गुन्हेगार घेत असून, यात सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याचे वारंवार समोर आले आहे.