पिंपरी-चिंचवड - कार भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून कारची विक्री करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 कोटी 20 लाखांच्या 16 कार जप्त केल्या आहेत. संबंधित आरोपी कार भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून मालकाच्या परस्पर कारची विक्री करत होते, असे चिंचवड पोलिसांनी सांगितले आहे.
कार भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून विकणाऱ्यांना अटक, आरोपींना अटक
याप्रकरणी आरोपींना अटक केली आहे. कल्पेश अनिल पंगेकर, नमन सहाणी, सनी भाऊसाहेब कांबळे, संदिप ज्ञानेश्वर गुंजाळ, हितेश ईश्वर चंडालिया, रोनित मधुकर कदम अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुनिल नामदेव राखपसरे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
कार मालकाला धमकी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सुनील राखपसरे यांना कार भाड्याने लावण्याचे आमिष दाखवले होते. यानंतर आरोपी सुनील यांची कार घेऊन गेले होते. मात्र, बराच अवधी गेला. त्यांना त्यांची कार दाखवण्यात आली नाही. तसेच, कारचे भाडेही त्यांना मिळाले नाही. याप्रकरणी सुनील यांनी आरोपींना फोन करून कारबाबत विचारणा केली. तेव्हा, त्यांना शिवीगाळ करत धमकी देण्यात आली.
कार विकत घेणाऱ्यांचीही फसवणूक
आरोपींनी इतर अनेकांची अशीच फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सुनील यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू करत आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. आरोपींनी कार मालकासोबत कार विकत घेणाऱ्या लोकांचीही फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे आणि गुन्हे पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
हेही वाचा -खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल