पुणे : पुण्याहून वरंधघाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर भीषण अपघात झाला. या मार्गावरील भोर महाडमार्गावरील वरंध घाटात शिरगावच्या हद्दीतील नीरा देवघर धरणाच्या पाण्यात एक कार कोसळली. यात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला, याचा सध्या तपास सुरू आहे. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला असून यात तीनजण बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कार पाण्यात कोसळली: राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त आहे. मुसळधार पावासामुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे प्रशासनाने पुणे आणि रायगडमधील वरंध घाटाचा रस्ता बंद केला आहे. वरंध घाट बंद केल्यानंतरही काही बहाद्दर प्रशासनाचा आदेश मोडून त्या मार्गे प्रवास करत आहेत. या मार्गे प्रवास करणे 4 जणांना महागात पडले आहे. अपघातग्रस्त कारमधून चारजण कोकणाकडे जात होते. नीरा देवघर धरणात ही कार कोसळली असून यात तिघांचा मृत्यू झाला आहे. कारने प्रवास करणारे प्रवासी पुण्यातील असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान दुर्घटना झाल्याची माहिती मिळताच स्थानिक बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार पुण्यातील आहे. कारमधील चौघेजण कोकणाच्या दिशेने जात होते. वरंध घाटातून जात असताना चालकाला धुके आणि पावसामुळे रस्त्याचा अंदाज आला नाही. यामुळे कार रस्त्याच्या बाजुला असलेला कठडा तोडून निरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळली.