पुणे - वीज ग्राहकाने वीज जोडणी घेतल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या वीज बिलात त्याच्या जोडभारानुसार आयोगाने मंजूर केलेल्या दराने किमान काही रक्कम स्थिर आकार म्हणून, आकारली जाते. मात्र, करोना प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने देशभरातील उद्योग गेल्या दीड महिन्यापासून बंद आहेत. हा बंद शासन आदेशाने करावा लागत असल्याने या कालावधीत स्थिर आकार लावण्यात येऊ नये, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सदस्य सूर्यकांत पाठक यांनी केली आहे.
गुजरात आणि कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यातील व्यापारी व औद्योगिक वीज ग्राहकांच्या लॉकडाऊन कालावधीतील स्थिर आकार रद्द (माफ) केला आहे. असा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने करावा, अशी मागणी गेल्या महिनाभरापासून सर्व औद्योगिक संघटनांनी तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने वारंवार राज्य शासनाकडे केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उर्जामंत्री, सर्व पालकमंत्री यांना अनेक वेळा ई-मेल, ट्विटर यावर निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.