पुणेCabinet Meeting In Marathwada :राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलीय. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये होणारी ही बैठक म्हणजे राजकीय डाव आहे. लाठीचार्ज झाल्यामुळं ही बैठक होत आहे. लाठीचार्जमुळं झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी ही बैठक होत असल्याचा घाणाघात अंधारे यांनी राज्य सरकारवर केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत आहेत, असा हल्लाबोल देखील त्यांनी पुण्यात केलाय.
भाजपाला पुढील निवडणूक जिंकता येणार नाही :पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समितीची बैठक झाली. पुण्यातील एस. पी. कॉलेजमध्ये झालेल्या या संघ परिवाराच्या बैठकीत देशभरातील 36 संघटनांचे 267 प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणुका बघून हे सर्व घडत असल्याचं अंधारे यांनी म्हटलंय. राज्यात भाजपाबद्दल खूप नकारात्मकता आहे, हे त्यांना माहीत आहे. देवेंद्र फडणवीस यांना राज्यात ठेवू नये, त्यांना दिल्लीला पाठवण्यासाठी महाराष्ट्रात ही बैठक होत आहे. कदाचित त्यामुळंच पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला पुढील निवडणूक जिंकता येणार नसल्याची टीका अंधारेंनी भाजपावर केलीय.