पुणे: घटनाक्रम असा की, एका महिलेस क्रेडीट कार्ड काढून देते असे सांगून एका भामट्या तरुणीने महिलेच्या कार्डची गाेपनीय माहिती घेतली. यानंतर परस्पर ऑनलाइन सहा आयफाेन खरेदी करत एकूण 3 लाख 91 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी आराेपीवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तक्रार दाखल करण्यात विलंब: प्रतीक्षा अविनाश चाैरे (रा. इंद्रायणीनगर, भाेसरी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. घटनेबाबत पीडिता संगिता हनुमंत गायकवाड (वय-46,रा.पर्वती,पुणे) यांनी पोलिसांकडे आराेपी विराेधात तक्रार दिली आहे. घटना सप्टेंबर 2021 ते ऑक्टाेबर 2021 यादरम्यान घडली. याबाबत तक्रारदार यांनी विलंबाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
आयफोन खरेदीसाठी कर्ज: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी प्रतीक्षा चाैरे हिने तक्रारदार संगीता गायकवाड यांना अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या आयडीएफसी बँकेचे क्रेडीट कार्ड काढून देते, अशी बतावणी केली. आरोपीने तक्रारदाराला त्यांच्या माेबाईलवर ओटीपी येईल असे सांगितले. यानंतर आरोपी तरुणीने तो ओटीपी क्रमांक माहीत करून घेत त्यांच्या बँक खात्यातून वेळाेवेळी दाेन लाख 70 हजार रुपये किंमतीचे आयफाेन माेबाईल खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले.