पुणे - डिझेलने ओलांडलेली शंभरी, टायर, बॅटरी, स्पेअर पार्ट्स व अन्य आवश्यक गोष्टींच्या वाढलेल्या किंमती, टोल व करांमध्ये झालेली वाढ यामुळे नाईलाजाने बस आणि कारच्या भाडेदरात १२ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य सरकारने बस व कारवरील करांमध्ये सूट द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे राज्यव्यापी अधिवेशन आणि वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. म्हात्रे पुलाजवळील सिद्धी गार्डन येथे झालेल्या या सभेवेळी असोसिएशनचे सचिव तुषार जगताप, खजिनदार दिनेश सोनवणे, कार्याध्यक्ष किरण देसाई, सल्लागार अनंत पुराणिक, जिल्हा शालेय सुरक्षा समितीचे सचिन पंचमुख आदी उपस्थित होते. राज्यभरातून जवळपास ५००-६०० बस आणि कार मालक या अधिवेशनासाठी उपस्थित होते.
वार्षिक सर्वसाधारण सभेत ही दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात -
पुण्यात छोट्या-मोठ्या अशा जवळपास १६००० बसेस असून, १००० पेक्षा अधिक बस व कारमालक असोसिएशनचे सभासद आहेत. कोरोना काळात जवळपास १९ महिने गाड्या जागेवर उभ्या होत्या. त्यामुळे व्यवसाय आधीच डबघाईला आलेला असताना, त्यात डिझेल, टायर, बॅटरी आणि स्पेअर पार्ट्स यासारख्या आवश्यक वस्तूंच्या किमती २५ ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. परिणामी, गाड्यांची देखभाल व दुरुस्ती करणे जिकिरीचे होत आहे. त्यामुळे आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे यावेळी राजन जुनवणे म्हणाले.
हेही वाचा -मला मंत्रिपदापेक्षा सामनाचे संपादक पद मोठे वाटते - खासदार संजय राऊत