पुणे : आज पहाटे तीन वाजल्याच्या सुमारास जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर एका खासगी बसचा अपघात झाला असून, या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 29 जण हे जखमी झाले आहेत. एकूण 42 प्रवासी या खासगी बसमधून प्रवास करत होते. या अपघाताबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. या अपघाताबाबत हायवे वाहतूक अपघातांचे अभ्यासक तन्मय पेंडसे यांनी आपल मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, प्रशासनाचे या रस्त्यावर दुर्लक्ष झाल्याने हा अपघात झाला असून शासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी देखील पेंडसे यांनी यावेळी केली आहे.
दुरुस्तीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज :ते पुढे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर आता मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असल्याने या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दिसणारी वाहतूक आता कमी झाली आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष कमी झाले आहे. सर्व लक्ष फक्त एक्सप्रेसवर आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस सुरू झाल्यापासून एसएसआरडीसीने या रस्त्यांवर साधे रबरही बसवलेले नाहीत. तसेच घाट रस्त्यावरील अनेक सुरक्षा कठडे तुटलेल्या अवस्थेत असल्याने अशा अपघातांना एकप्रकारे आमंत्रणच आहे. त्यामुळे सरकारने जुन्या मुंबई पुणे महामार्गाच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा तन्मय पेंडसे यांनी व्यक्त केली.