पुणे - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. याबाबत प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी, हा अर्थसंकल्प अपेक्षापूर्ती करणारा असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा -आई-वडिलांना मानणारा, पत्नीला बरोबरीचे स्थान देणारा व्यक्ती म्हणजेच हिंदू - चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प कसा असेल, अशी उत्सुकता सर्वांना होती. वर्षभरात कोरोनामुळे आर्थिक गाडे रुळावरून उतरले होते. परंतु, मागील पाच महिन्यात विक्रमी जीएसटी जमा झाल्याने अर्थव्यवस्था सुरळित होण्यास मदत झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना सुखी व सुरक्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पेरणी ते काढणी पर्यंत शेतकऱ्यांना खर्च भागवून 50 टक्के नफा मिळावा, या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी अर्थसंकल्पात होवून शेतकऱ्यांकरिता भरीव तरतूद देण्यात आली आहे.
मध्यम वर्गाची अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प - चंद्रकांत पाटील
ग्रामीण भागातील रस्ते आणि पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात याकरिता 40 हजार कोटींची तरतूद करण्यात आली. मध्यम वर्गाची अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. 12 कोटी मध्यमवर्गीय लोक लघू उद्योगात कार्यरत असून, या उद्योगाच्या बळकटीकरणाचे काम सरकार करत आहे. पश्चिम बंगाल सारख्या काही राज्यांतील विकास अनेक वर्षे दुर्लक्षित होता. त्या ठिकाणी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अधिक पैसा देऊन सरकारने गुंतवणूक केली, असे म्हणता येणार नाही, असेही पाटील म्हणाले.
पुण्यात लवकरच मेट्रो धावेल
अर्थसंकल्पात नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठी निधी देण्यात आला आहे. परंतु, पुणे मेट्रोस अधिक निधी दिला नाही. याबाबत पाटील म्हणाले, पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर असून डिसेंबर 2021 पर्यंत पाच मार्ग पूर्ण होतील. पहिल्या टप्प्यातील एक मार्ग मार्च महिन्यात सुरू होईल. 31 किलोमीटरचा मेट्रो मार्ग सुरुवातीला कार्यरत करण्यात येणार असून रस्त्यावरील अडीच लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतील, असे नियोजन आहे. दुसऱ्या टप्प्यात 70 किलोमीटर मेट्रोमार्ग कार्यान्वित करून ५ लाख प्रवासी वाहतुकीचे नियोजन आहे. मेट्रोचे 150 किलोमीटरचे मार्गाचे काम पूर्ण होऊन सर्व मार्ग कार्यरत झाले तर रस्त्यावरील 15 ते 16 लाख प्रवासी मेट्रोन प्रवास करून रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होईल, अशी अपेक्षा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
हेही वाचा -प्रजासत्ताकदिनी कोकणकड्यावर फडकला सर्वात मोठा तिरंगा