पुणे - सध्या सर्वजण मोबाईलमध्ये व्यग्र असलेले पाहायला मिळतात. काहीजण सोशल मीडिया, पब्जीसारखे जीवघेणे गेम्स यासारख्या बाबींच्या आहारी गेलेले असतात. मात्र, एका लहान मुलाने मोबाईलचा वापर करून संगीत शिक्षणाचा छंद जोपासला आहे. मोबाईलच्या माध्यमातून तो मधुर सुरामध्ये बासरी वाजवायला शिकला आहे.
मोबाईल बनला संगीत शिक्षक, ऐका...लहान मुलाचे मधुर बासरी वादन - बासरी वादन पुणे न्यूज
पुण्यातील एक लहान मुलगा मोबाईलमधून व्हिडिओ पाहून बासरी वाजवायला शिकला आहे. तो मधुर बासरी वादन करीत असून त्याला खूप मोठे व्हायचे असल्याचे त्याने सांगितले.
अथर्व सोनवणे, असे या लहानग्या बासरी वादकाचे नाव असून तो चाकणमधील सर्वसामान्य कुटुंबातील आहे. संगीताचे शिक्षण म्हटले तर शिकवणी, प्रशिक्षक अशा सर्व मोठ्या खर्चाचा बोजा कुटुंबावर पडतो. मात्र, त्यातून योग्य शिक्षण मिळेल याची खात्री नसते. त्यामुळे अथर्वने आपल्या वडिलांच्या मोबाईलमध्येच व्हिडिओ पाहून बासरी वाजवण्याचे ठरवले. त्यानुसार तो दररोज व्हिडिओ पाहून बासरी वाजवण्याचा सराव करायचा. आता तो उत्तम बासरी वाजवायला शिकला आहे. तसेच त्याला या क्षेत्रामध्ये खूप मोठे व्हायचे असल्याचे अथर्वने सांगितले. त्याची शिकण्याची जिद्द बघता तो नक्कीच मोठा होईल, असेही त्याच्या कुटुंबीयांना वाटते.