पुणे -जिद्द, चिकाटी आणि ध्येय गाठण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर काहीच अशक्य नाही, हे पुण्यातील दिव्यांग प्रणितकुमार गुप्ताने दाखवून दिले आहे. प्रणितला जन्मतः अंधत्व आहे. त्याने बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स अर्थात बीएमसीसीच्या वाणिज्य शाखेत बारावीच्या निकालात दिव्यांगामध्ये 86.46 टक्के गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या प्रणित कुमारला जन्मत: पूर्ण अंधत्व आले. अंधत्व आल्याने त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अभ्यासापासून ते लिहिण्यापर्यंत अनेक अडचणींवर मात करत प्रणितने दहावीमध्ये 96 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवले. त्याची अभ्यासाची आवड पाहून त्याच्या पालकांनी त्याला पुढील शिक्षणासाठी बीएमसीसी महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला.
मागील दोन वर्षापासून प्रणित हा महाविद्यालयातील वसतिगृहात राहत होता. तेथे तो पुस्तके रेकॉर्ड करून अभ्यास करत असे. वस्तीगृहातील अनेक अडचणी त्याच्यासमोर येत होत्या. मात्र, त्यावर मात करत तो त्याचा अभ्यास पूर्ण करत असे. महाविद्यालयात प्रथम आल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रणितला अभ्यासाबरोबरच तबला वादनाचा ही छंद आहे. तबला वादनाची आवड आणि सराव यामुळे त्याला गतवर्षी बालश्री राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे.
हेही वाचा -कोरोनाबाधित आजीला तरुणाच्या रुपात भेटला 'देव'; स्वतःच्या पाठीवर उचलून रुग्णालयात केले दाखल