पुणे - देशात कोरोनापाठोपाठ आता काळ्या, पांढऱ्या आणि पिवळ्या बुरशीचे संकट उभे राहिले आहे. देशात म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ होत आहे. तर 250 हुन अधिक जणांचे मृत्यू झाले आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.
म्यूकरमायकोसिस म्हणजे काय ?
म्यूकरमायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार आहे. रोग प्रतिकारकशक्ती कमी असलेल्या रुग्णांना यापासून जास्त धोका आहे. नाकाद्वारे ही बुरशी शरीरात जाते. तेथून ती सायनसमध्ये वाढते. कर्करोगाच्या पेशींपेक्षाही जलद गतीने वाढणारी ही बुरशी डोळ्यांतील पेशी, मेंदूतही प्रवेश करते. त्यामुळे इतर बुरशीजन्य आजारांपेक्षा हा संसर्ग जास्त धोकादायक आहे. नाकातून काळसर द्रव बाहेर येणे, नाक सतत वाहणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे लाल होणे, सुजणे, कमी दिसणे अशी याची प्रमुख लक्षणे आहे.
कोणाला जास्त प्रमाणात लागण?
कोरोना झालेल्या रुग्णांना म्यूकरमायकोसिस हा नवीन आजार होत आहे. यात काळी, पांढरी आणि पिवळी बुरशी या तीन प्रकारच्या बुरशी असतात. राज्यात काळ्या बुरशीच्या रुग्णांचे प्रमाण हे अधिक आहे. पांढरी बुरशीचे काही रुग्ण हे बिहारमध्ये आढळून आले आहेत. तर उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे काही रुग्णांना पिवळ्या बुरशीची लागण झाली आहे. यातील एक साम्य म्हणजे हा बुरशीजन्य आजार आहे. हा आजार कोरोना झालेल्या रुग्णांना होत आहे. त्यातही ज्यांना मधुमेह आहे आणि ज्यांना कोरोना झालं आहे तसेच ज्यांना स्टेरॉईड दिली गेली आहे, अशा रुग्णांना हा आजार सर्वाधिक होत आहे.