पुणेNana Patole Criticism BJP: पुण्यातील काँग्रेस भवन येथे पश्चिम महाराष्ट्र विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर, आमदार प्रणिती शिंदे, आमदार डॉ. विश्वजीत कदम यांची उपस्थिती होती. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले बोलत होते. आजच्या या बैठकीनंतर एकूण सहा जिल्हानिहाय आढावा बैठका या राज्यभर होणार आहेत आणि राज्यातील तसेच केंद्राच्या सरकारचा खरा चेहरा हा नागरिकांच्या समोर आणला जाणार आहे, असं यावेळी नाना पटोले म्हणाले.
इंग्रज तरी कुठेतरी विचार करायचे:नाना पटोले पुढे म्हणाले की, इंग्रज तरी कुठेतरी विचार करत होते; मात्र हे लोक तर शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांचे कसे नुकसान होईल याचा विचार करत आहेत. हे सरकार त्यांच्या मित्रांचा विचार करणारं; पण शेतकऱ्यांचा विचार करणारं नाही. म्हणून कालच्या जीएसटी परिषदेत असा निर्णय घेण्यात आला असल्याची टीका यावेळी नाना पटोले यांनी केली.
उपमुख्यमंत्र्यांचा डोळा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर:राज्यातील सरकार बाबत नाना पटोले यांना विचारलं असता ते म्हणाले की, या राज्यात गरिबांना, शेतकऱ्यांना जगण्याचा अधिकार नाही. हे स्वार्थी सरकार आहे. हे सरकार असंविधानिक आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डोळा हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर लागलेला आहे आणि शासकीय रुग्णालयात मृत्यू तांडव होत असताना सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे, अशी टीका यावेळी नाना पटोले यांनी केली आहे.