बारामती (पुणे) : बारामतीत भाजप कार्यकर्त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादीकडून बारामतीत पडळकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आज (गुरुवार) बारामती येथे भाजप कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत 'गोपीचंद आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा करून पडळकरांना समर्थन दिले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत जहरी टीका केली. त्यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्राभर उमटले. यानंतर अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आली. बारामतीत मोठ्या प्रमाणात याचे पडसाद उमटले. बारामती शहर पोलीस ठाण्यात पडळकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ बारामतीत भाजप कार्यकर्ते रस्त्यावर हेही वाचा...पडळकरांविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक, भाजप कार्यालयासमोरच आंदोलन
गोपीचंद पडळकर यांच्यावर बारामतीत गुन्हा दाखल झाल्याचे समजताच भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर जमत पडळकर यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी एकत्र जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी 'गोपीचंद तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे', 'महाराष्ट्राचा ढाण्या वाघ गोपीचंद गोपीचंद' अशी घोषणाबाजी केली.
काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?
पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्यावर वादग्रस्त विधान केले. गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे की, "शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे, असे माझे मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचे नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचे आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे." असे विधान पडळकर यांना केले.
हेही वाचा... पडळकरांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल; पवारांविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवले