पुणे -'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विलगीकरण केंद्रांमध्ये महिला सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे. अजून किती महिलांवर विलगीकरण केंद्रांमध्ये अत्याचार झाल्यावर सरकार नियमावली जाहीर करणार आहे? असा प्रश्न भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी विचारला. पुण्यातील 'जम्बो कोविड सेंटर'मधून प्रिया गायकवाड ही तरुणी गायब झाल्याचा आरोप करत तिचे आई-वडील उपोषणाला बसले आहेत. या मुद्द्यावर वाघ यांनी त्यांची भेट घेतली.
चित्रा वाघ म्हणाल्या, राज्याच्या वेगवेगळ्या कोविड केअर केंद्रांमध्ये दाखल झालेल्या कोरोनाबाधित महिलांना कशाप्रकारे हाताळले जाते, त्याचे हे उदाहरण आहे. पुण्यातील ही पहिलीच घटना नाही, याआधी अशा प्रकारच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. संपूर्ण राज्यात कोविड केअर केंद्रांमध्ये आतापर्यंत 12 विनयभंगाच्या तर दोन बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. गेल्या चार महिन्यांपासून कोविड केअर केंद्रांमध्ये उपचार घेणाऱ्या महिलांसाठी काहीतरी ठोस उपाययोजना कराव्यात त्याची मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत. परंतु, त्याकडे अद्यापही गांभीर्याने पाहिले जात नाही. अशा किती घटना घडल्यानंतर सरकारला जाग येईल? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी यावेळी उपस्थित केला.