पुणे:भाजपच्या 'घर चलो' या संपर्क अभियानाचा शुभारंभ आणि भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (सोमवारी) पार पडले. यावेळी फडणवीस म्हणाले की, काही लोकांची सध्या अवस्था 'बेगानी शादी में अब्दुला दिवाना' अशी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकही आमदार कर्नाटकात जिंकून आले नाही. तरी त्यांचे लोक हे जल्लोषात पुढे तसेच ज्यांचे काहीच विषय नाही ते शिवसेनेचे कार्यकर्ते देखील पुढे होते; पण याचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा जिंकून येणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये न्यायालय निर्णय देईल तेव्हा आपल्याला महापालिकेच्या निवडणुका जिंकायच्या आहेत, असे देखील यावेळी फडणवीस म्हणाले.
मोदींचे नेतृत्व जगमान्य:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक गतीने विकास केला. कोरोना काळानंतर अनेक देश मंदीच्या सावटाखाली आहेत; पण आपला देश विकासाच्या वाटेवर आजही मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे विकसित देश देखील आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहे. आजही मोदींचे नेतृत्व जगमान्य झाले आहे. मोदींच्या नेतृत्वातील विकासपर्वाचे काम कार्यकर्त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले.