पुणे -पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार सुरू केला असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत, असा आरोप करत राज्य भाजपने या विरोधात राज्यभर निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते उद्या बुधवारी राज्यभर ठिकठिकाणी निदर्शने करणार आहेत, अशी घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
पश्चिम बंगाल हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपाकडून उद्या राज्यभर निदर्शने - पश्चिम बंगाल हिंसाचार
तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार सुरू केला असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत, असा आरोप करत राज्य भाजपने या विरोधात राज्यभर निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते उद्या बुधवारी राज्यभर ठिकठिकाणी निदर्शने करणार आहेत.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत, असे पाटील यांनी म्हटले आहे. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपाचे कार्यकर्ते राज्यात शांततामय निदर्शने करतील. कोरोनाचे नियम पाळून हे आंदोलन होईल. लोकशाहीबद्दल आस्था असलेल्या सर्व नागरिकांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.