पुणे :उस्मानाबाद शहराचे धाराशीव नामकरण करण्यास केंद्र सरकारने ‘ना हरकत पत्र’ दिले असून, औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे केंद्राच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जोरदार टीका केली आहे.
ढोंगी पणा जाहीर :भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान केले आहे. ते म्हणाले की स्वतःहा ढोंग रचलेल्या व्यक्तीने दुसऱ्याला ढोंगी म्हणू नये. यांचा ढोंगी पणा जाहीर झाला आहे. बहुमत नसलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला. पण अडीच वर्ष सरकारमध्ये असताना का निर्णय घेतला नाही. शिंदे फडणवीस सरकार लवकरच प्रस्ताव मंजूर करून घेणार असे यावेळी बावनकुळे म्हणाले. आज पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.
निवडणुक प्रतिष्ठेची : काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंग बाबत विचारले असता ते म्हणाले की काल झालेल्या बैठकीत कुणीही उद्योजक नव्हते. मी देवेंद्र फडणवीस, कोअर ग्रुपचे मेंबर होते. ही औपचारिक बैठक होती. यात देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. भाजप प्रत्येक निवडणुकीत आपली ताकद आजमावत असतो. जेव्हा निवडणूक असते तेव्हा ती पक्षासाठी प्रतिष्ठेची असते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्ता जे करतो तेच या निवडणुकीत आम्ही करीत आहे, वेगळे काहीच नाही, असे देखील यावेळी बावनकुळे म्हणाले.
भाजपात कोणीही नाराज नाही :भाजपचे नेते संजय काकडे हे नाराज असल्याची चर्चा आहे. यावर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की आमच्यात नाराज कोणीच नाही. संजय काकडे पहिल्यापासून माझ्यासोबत आहेत. संजय काकडे यांच्यावर कोणी नाराज नाही. हा भाजप पक्ष आहे. कोणावरही शंका व्यक्त करणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.