पुणे :पुण्यात आज पक्षीय बैठकीसाठी बावनकुळे पुण्यात आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. पुण्यात आज आम्ही या बैठका संपूर्ण २८८ विधानसभा मतदार संघात घेत आहोत. आम्ही घर चलो अभियान राबवत आहोत. पक्ष संघटनेचे काम मजबूत करण्याचा हा प्रयत्न आहे, असे बावनकुळे म्हणाले आहेत. पवारांच्या राजीनामा नाट्यवर बोलतांना म्हणाले, यात भाजपचा कुठलाही डाव नव्हता. अजित पवार यांचा मागच्या चार महिन्यापासून माझा संपर्क झाला नाही, ते आमच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात नाहीत, हेच मी सांगत होतो.
मोदींच्या नेतृत्वात कर्नाटक जिंकू : त्यांच्या महाविकास आघाडीकडूनच अजित पवारांना टार्गेट केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही तीन दिवस झाले, ती सगळी स्क्रिप्ट होती. राष्ट्रवादीचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी आणि घरगुती तमाशा होता, असेही ते म्हणाले आहेत. कर्नाटक निवडणुकीवर बोलतांना कर्नाटकात भाजपला निवडून येण्यासाठी कुणाचीही गरज नाही. मोदींच्या नेतृत्वात आम्ही कर्नाटक जिंकू. तिथे भाजपचे सरकार येईल. मराठी भाषेला आणि मराठी माणसाला न्याय देण्याची आमची भूमिका कायम आहे. पक्ष आणि पक्षाचा नेता आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, असे बावनकुळे म्हणाले आहेत.