पुणे : पुण्यातील भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस कर्मचारी, तसंच राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) पदाधिकारी राजीव सातव यांच्या कानशिलात लगावली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडला आहे. यानंतर सुनील कांबळे यांनी मारहाण केली नसल्याचं सांगत सारवासारव केलीय. आता शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुनील कांबळे यांच्यासह भाजपावर टीका केली आहे.
भाजपा आमदाराची मारहाण : पुण्यातील ससून रुग्णालयात विविध वॉर्डांचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार रवींद्र धंगेकर, भाजपा सुनील कांबळे यांची उपस्थित होती. या कार्यक्रमात पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे भाजपा आमदार सुनील कांबळे यांचं निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यानं त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी राजीव सातव यांना मारहाण केली.
सुनील कांबळेंची गुंडगिरीसाठी ओळख : यावर सुषमा अंधारे यांनी म्हटलंय की, “सुनील कांबळेंना वादग्रस्त विधानं तसंच गुंडगिरी करण्यासाठी ओळखलं जातं. दोन वर्षांपूर्वी सुनील कांबळे यांनी पुणे महापालिकेतील एका महिला अभियंत्याला अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. तर, आनंदनगरमधील रहिवाशांना सुनील कांबळे यांनी बिल्डरच्या फायद्यासाठी जबरदस्ती केली. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कांबळे यांनी गुंडगिरी केली आहे. कांबळे यांना पहिल्या प्रकरणात समज दिली, असती किंवा निलंबनाची कारवाई केली असती, तर त्यांच्यात पुन्हा असं करण्याची हिंमत आली नसती.