पुणे -पिंपरी-चिंचवड महापालिकेने वनीकरण वृक्षारोपण, आयुर्वैदिक झाडांची जोपासना करण्यासाठी 21 वर्षाच्या कराराने “निमा’ या संस्थेला मोकळा भूखंड दिला होता. दिलेल्या भूखंडाची परस्पर विक्री झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘औषधी उद्यान’ला खोडा घालणाऱ्या या निर्णयाविरोधात डॉक्टरांसोबत रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.
वनीकरणासाठी असलेल्या या जागेला कमर्शियल स्पेसमध्ये रुपांतरित करत तिची विक्री केली असून याबाबत पालिकेकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असा दावा डॉक्टरांसाठी काम करणाऱ्या ‘निमा’ या संस्थेने केला आहे.
वृक्षारोपणासाठी 21 वर्षाच्या कराराने दिली जमीन -
विशेष म्हणजे, एमआयडीसी प्रशासन आणि महापालिकेच्या या भूमिकेविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही ‘निमा’ संस्थेने दिला आहे. संबंधित जागा डम्पिंग ग्राउंड म्हणून वापरली जात होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेने 2009 साली वनीकरणासाठी राखीव ठेवलेल्या मोकळ्या जागांमधून निमाला भोसरी येथील एक एकर जागा वनीकरण व वृक्षारोपणासाठी 21 वर्षाच्या कराराने दिली होती.
साडेचारशे आयुर्वेदिक वृक्षांची लागवड -
महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये याबाबत 27 फेब्रुवारी 2008 रोजी ठराव झाला होता. ही जागा अत्यंत उंच सखल अशी होती. त्यावर संस्थेच्या सदस्यांनी मेहनत घेत साडेचारशे आयुर्वेदिक वृक्षांची लागवड करत, उद्यान फुलवले. उद्यानीतल झाडे आता सात ते आठ फूट उंचीची झाली आहेत. मात्र, एके दिवशी काही व्यक्तींनी येवून जागा एमआयडीसीने विकली असल्याचे सांगत जागेवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा)चे सचिव डॉ. अभय तांबिले यांनी दिली.
हेही वाचा -भारतात 'या' दिवशी साजरा केला जातो पेन्शनधारकांचा दिवस