पुणे -पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालात भाजप उमेदवार समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली आहे. ते जवळपास विजयाच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या निकालाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारला जनतेने जोरात थोबाडीत मारल्याचे सिद्ध होत असल्याचे म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, सहानुभूती आणि खोटी आश्वासने यावर मतदान करणार नसल्याचे मतदारांनी सिद्ध केले आहे. रोजच्या जगण्यामध्ये तोंड द्यावे लागणाऱ्या वाढीव वीज बिल, वीज तोडणी, कर्जमाफीची अंमलबजावणी न होणे या मुद्द्यावर मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे येथील मतदारांनी एक जोरदार चपराक महाविकास आघाडीच्या थोबाडीत मारली आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजय निश्चित झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील बोलत होते.