कंगनावर बोलता तसे चार वाक्ये कोविडवर बोला, प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा - भाजप नेते प्रविण दरेकर बातमी
सद्या राज्यात ठाकरे सरकारकडून कंगना रनौतला अधिक महत्व दिले जात आहे. ठाकरे सरकार तिच्यावर टीका व कारवाई करण्यात गुंतले आहे. त्यापेक्षा त्यांनी कोरोना विरुद्धच्या लढ्याला अधिक महत्व दिले असते तर राज्यातील जनता त्यांना दुवा देईल, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांंनी व्यक्त केले.
पुणे - कोरोना महामारीला महत्व न देता कंगना रनौत प्रकरणाला राज्यशासन महत्व देत आहे. चार वाक्य तिच्यावर बोलण्याऐवजी कोविड विषयी बोलल्यास राज्यातील जनतेला दिलासा मिळेल, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर केली. ते लोणावळा शहरात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी लोणावळा शहरातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा केली.
लोणावळा शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेकडून संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळून पहिल्या टप्प्यात घरोघरी जाऊन महासर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे. महासर्वेक्षण अभियानाचे उद्घाटन आज विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.
यावेळी दरेकर म्हणाले, की कोरोना ग्रामीण भागासह छोट्या शहरात पसरत आहे. मात्र, या प्रशासनाला जाग कधी येणार हे कळत नाही. पत्राच्या माध्यमातून आम्ही आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची परिस्थती सांगण्याचा प्रयत्न केला. दुरवस्था विधी मंडळात मांडल्या. परंतु, राज्यशासन हे आपापल्या विसंवादात, कंगना रनौतमध्ये रंगलेले दिसत आहे. कोविडला महत्व द्यावे असे त्यांना वाटत नाही. नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. त्यांच्या अडचणी वाढत आहेत. परंतु, ठाकरे सरकारला सर्वात महत्वाचे कंगना रनौत प्रकरण आहे. जेवढ तिच्यावर बोलत आहेत त्याची चार वाक्य कोविडवर बोलले आणि कोविड विषयी व्यवस्था केली तर राज्यातील जनतेला दिलासा मिळेल, अशी बोचरी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली.