पुणे- शहरात महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र जरी निवडणूक लढली तरी पुण्यात भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकेल आणि महापौर भाजपचा असेल, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
पुण्यात प्रभाग क्रमांक 41 कोंढवा बुद्रुक येथील भाजप कार्यालयाचे उद्घाटन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भारतीय जनता पक्षच नंबर एक
राज्यात महाविकास आघाडी सरकारचे राज्य आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक पक्ष आपला पक्ष पहिल्या क्रमांकाचा कसा बनेल, यासाठी धावपळ करत आहे. मात्र, त्यांची ही स्पर्धा दोन, तीन आणि चार नंबरसाठी आहे. कारण, राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आहे. म्हणूनच पुण्यात भारतीय जनता पक्षाची पुन्हा सत्ता येईल आणि महापौरांही भारतीय जनता पक्षाचा होईल, असे मत यावेळी प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.
नाना पटोले यांची भूमिका महाविकास आघाडी सरकारची का ?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना चित्रीकरण करू देणार नाही, असे विधान केले आहे. नाना पटोले यांचे हे विधान महाविकास आघाडी सरकारचा आहे का, हे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
पंधरा दिवस झाले तरी पूजा चव्हाण प्रकरणात गुन्हा दाखल नाही
काही दिवसांपूर्वी पुण्यात पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली होती. त्यावरून विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. राज्यात अशा पद्धतीची घटना कधीच घडलेली नाही. पंधरा दिवस झाले तरी गुन्हा दाखल झालेला नाही. उलट समाजाचे मोर्चे काढले जात आहेत. हे राज्य सरकारसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकार आपल्या मंत्र्यांना पाठीशी घालत असून केवळ आपली सत्ता टिकावी यासाठी राज्य सरकारचे राजकारण सुरू आहे.
आता पुण्याची 'क्राईम सिटी'म्हणून होतेय ओळख
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या सरकारमधील काही नेते म्हणत होते की नागपूर ही क्राइम सिटी झाली आहे. मात्र, आता ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढत आहे त्यानुसार पुणे आता क्राईम सिटी झाली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे महिलांवरील अत्याचार देखील वाढले आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारने स्वतः कोरोनाबाबतचे नियम पाळावे
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. मुख्यमंत्र्यांनी भावनिक आव्हानापेक्षा कृती करून दाखवावी. कोरोनाच्या काळात आपण कमी पडलो हे सरकारने मान्य केले पाहिजे. लोकांच्या मनात सरकारने दहशत पसरू नये. राज्यात जुलमी राजवट आहे असेही दाखवू नये. कोरोनाबाबत सरकारमधील मंत्र्यांचे वेगवेगळे विधान समोर येत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात लग्न सोहळा होत असून लग्नसोहळ्यात महाविकास आघाडीतील नेते मोठ्या प्रमाणात सामील होत आहेत. एकीकडे सरकार जनतेवर निर्बंध आणत आहेत. मात्र, दुसरीकडे सरकारमधील नेतेच अशा विवाह सोहळ्यात उपस्थिती लावत आहे. त्यामुळे सरकारने केलेले नियम त्यांनी स्वतः पाळले पाहिजे, असेही यावेळी दरेकर म्हणाले.
हेही वाचा -मारणेच्या स्वागताप्रकरणी 17 आरोपींना अटक; मारणे आणि इतरांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना