पुणे- 'राजा उधार झाला आणि शेतकऱ्यांच्या हाती भोपळा दिला', अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकस्त्र सोडले. शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती भोपळा देण्याचं काम राज्य सरकारने केलं असल्याची टीका फडणवीस यांनी केली. कृषी कायद्याच महत्व पटवून देण्यासाठी भाजप नेते देशभर ठिकठिकाणी 'शेतकरी सन्मान मेळावे' आयोजित करत आहेत. पुण्याजवळील मांजरी बुद्रुक येथील शेतकरी सन्मान मेळाव्यात फडणवीस सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
कृषी कायद्याच्या संदर्भात राज्य सरकारची दुटप्पी भुमिका-
साखरेसाठी मोदी सरकारने एम एस पी नक्की केला आहे. तर साखर उद्योगासाठी दोन लाख कोटी रुपयांचा निधी नक्की करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी तीन क्रांतिकारी कायदे पंतप्रधानांनी आणले. या कायद्याची आवश्यकता काय आहे? हमाली, भराई, तोलाई भाडे यात किती शेतकऱ्यांना पैसा द्यावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना यातून मुक्ती मिळाली पाहिजे. मात्र, काही लोकं या कृषी कायद्याचा संदर्भात दुटप्पी भूमिका घेत असल्याचे फडणवीस म्हणाले.