पुणे - पुण्यात ज्या तरुणीने शिवसेना नेते रघुनाथ कुचीक ( Raghunath Kuchik ) यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता ती तरुणी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची झाली आहे. ( Pune Girl Disappeared ) शनिवारी या पीडितेने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पुणे पोलिसांच्या प्रसंगावधानाने त्या मुलीला वाचवण्यात यश आलं. आता मात्र ती मुलगी कुठेच सापडत नाही आहे. याच प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh on Pune Girl Disappeared ) यांनी शिवसेना नेत्यावर टीका केली.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
बेपत्ता झालेल्या तरुणीचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही आहे. तीचं आजचं लोकेशन पणजी दाखवत आहे. पोलीस तसा तपासदेखील करत आहेत. ती मुलगी जिथं कुठे आहे ती सुखरूप असावी अशी प्रार्थना देखील केली आहे. त्याचबरोबर त्यांनी रघुनाथ कुचीक यानेच त्या मुलीला बेपत्ता केलं असेल, अशी माझी शंका आहे, असेही त्या म्हणाल्या.
रुपाली चाकणकर यांच्यावर टीकास्त्र -
त्याचबरोबर जी मुलगी बेपत्ता झाली आहे ती आमच्या संपर्कात आहे, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज सकाळीच दिली होती. त्यांच्या या विधानावर देखील चित्रा वाघ यांनी टीका केली. ती मुलगी बेपत्ता असताना देखील जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीने असं बेजबाबदार विधान करून आपलं अडाणीपण दाखवू नये, अशी खोचक टीका चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर केली आहे.