पुणे - चांदणी चौक भागात मुलगी टाकून निघून गेलेल्या महिलेची भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी तिच्या समुपदेशनाची जबाबदारी घेतली असल्याचे सांगितले. गुरुवारी (18 जून) संबंधित महिला आपली चार महिन्याची मुलगी चांदणी चौक भागात ठेवून निघून गेली. त्यानंतर कोथरूड पोलिसांनी मुलीच्या वडिलांचा शोध घेऊन तिला त्यांच्या ताब्यात दिले. दुसऱ्या दिवशी वारजे पुलाखाली बसलेल्या या महिलेला शोधण्यातही पोलिसांना यश आले. त्यानंतर तिला ताब्यात घेऊन तिचे समुपदेशन करण्यात आले.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्या घरी जाऊन तिची आणि कुटुंबियांची भेट घेतली. या महिलेची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी समुपदेशनाची सोय करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक किरण दगडे पाटील, भाजप युवा मोर्चाचे दुष्यंत मोहोळ आदी उपस्थित होते.
काय आहे घटना?
आंबेगाव परिसरातील तुकाराम क्षीरसागर यांची ही मुलगी आहे. बाळाची बातमी माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने तुकाराम यांना तुमची मुलगी असल्याचे सांगितले. त्यानंतर तुकाराम क्षीरसागर हे कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी मुलीचा ताबा घेतला. तुकाराम हे पत्नी लक्ष्मीसह एकत्र कुटुंबात राहत असून ते फर्निचरची कामे करतात. त्यांना यापूर्वीही एक मुलगा आणि मुलगी आहे.
काल, दुपारी तुकाराम कामावर गेले असताना बाळाची आई लक्ष्मी क्षीरसागर ही दवाखान्यात जाते, असे सांगून घराबाहेर पडली होती. ती रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही म्हणून कुटुंबियांनी शोधाशोधही केली होती. मात्र, ती सापडली नाही. दरम्यान, बाळाची बातमी पाहून तुकाराम यांना धक्का बसला. घरात कोणत्याही प्रकारचे भांडण झाले नाही, तरीही पत्नीने असे का केले. हे माहित नसल्याचे तुकाराम यांनी सांगितले.