पुणे - 'महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पीक विम्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. आघाडी सरकारच्या धोरणामुळे विमा कंपन्या मालामाल, तर शेतकऱ्यांची लूट झाली आहे', असा आरोप भाजपा किसान मोर्चाने केला आहे.
भाजपा किसान मोर्चाचे नेते अनिल बोंडे 'ठाकरे सरकारच्या काळात शेतकऱ्यांची लूट, विमा कंपन्या मालामाल'
'महाविकास आघाडी सरकारने 2020 मध्ये खरीप पिकासाठी विम्याचे निकष बदलले. उंबरठा उत्पादन कमी केले. त्यामुळे महाराष्ट्रात 2020 मध्ये केवळ 643 कोटी रुपये पीक विमा नुकसान भरपाई वाटप करण्यात आली आहे. विमा कंपन्यांना ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने 4234 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. ठाकरे सरकारच्या काळात शेतकऱ्यांची लूट आणि विमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत', असा आरोप भाजपा किसान मोर्चाचे नेते अनिल बोंडे यांनी केला आहे.
विमा नुकसान भरपाई संदर्भात भाजपा किसान मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी पत्रकार परिषद घेऊन मोर्चाची भूमिका मांडण्यात येते आहे. त्या पार्श्वभूमीवर अनिल बोंडे यांनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
'ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने विमा कंपन्यांना 4234 कोटींचा निव्वळ नफा'
'फडणवीस सरकारच्या काळात खरीप 2019 साठी पिक विमा कंपन्यांसोबत केलेल्या करारानुसार 85 लाख शेतकर्यांना 5 हजार 795 कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. मात्र ठाकरे सरकारच्या काळात गेल्या वर्षी केवळ 743 कोटी रुपये एवढा विमा वाटप करण्यात आला. पंतप्रधान पिक विमा शेतकऱ्यांच्या भल्या करता आहे. तरीही महाराष्ट्रामध्ये विमा कंपन्या मालामाल करण्याचा उद्योग ठाकरे सरकारने केला आहे. खरीप 2020 मध्ये अवकाळी पाऊस, चक्रीवादळ अशी अनेक संकटे आली. बोंड अळीमुळे कापसाचे कमी उत्पादन मिळाले. बियाणांचे प्लॉटही खराब झाले. तरीही विमा कंपन्यांनी कृषी विभागासोबत हात मिळवणी केली आणि फक्त 15 लाख शेतकऱ्यांना 974 कोटी रुपयांची नुकसान भरपाई निश्चित केली. त्यातील 643 कोटी रुपयांचे वाटप फक्त 11 लाख शेतकऱ्यांना करण्यात आले. त्यामुळे या काळात विमा कंपन्यांना ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने 4234 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला', असा आरोप यावेळी अनिल बोंडेंनी केला.
हेही वाचा -आजीने दिले दीड वर्षीय चिमुकल्याच्या पोटाला गरम विळ्याने चटके, अखेर दुर्दैवी मृत्यू