पुणे:महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेवेळी अजित पवार यांचे भाषण सुरू असताना सभेच्या बाहेरील बाजूस असलेल्या रस्त्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कृत्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एकमेकांच्या प्रचारासाठी वेगवेगळे विभाग दिले जातात. मात्र आमची नातू बाग येथील सभेच्या ठिकाणी भाजप उमेदवाराची रॅली काढण्यात आली. याबाबत आम्ही पोलिसांकडे नाराजी व्यक्त केली. पोलीस भाजपच्या दबावाखाली काम करीत आहे. हा रडीचा डाव असल्याची टीकाही जगताप यांनी केली आहे.
काळे फुगे पोलिसांनी घेतले ताब्यात : कसबा विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडीचे आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली सभेला सुरवात झाली. त्यावेळी व्यासपीठावर काळे फुगे आणि त्यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोटो घेऊन आले होते. ते फुगे अजित पवार यांना कार्यकर्त्यांनी सोडण्याची विनंती केली. त्यावर अजित पवार यांनी हात जोडले. त्याचवेळी पोलिसांनी व्यासपीठावर येऊन फुगे ताब्यात घेतले.