पुणे - भाजपच्या बाजूने लढाई लढत असलेला कार्यकर्ता राष्ट्रभक्तीची लढाई लढत आहे. देश आणि समाजाला बळकट करणारी लढाई आपण लढत आहोत. तर विरोधी पक्षातील निम्मे नेते एकतर तरुंगामध्ये आहेत किंवा जामीनावर आहेत, अशी टीका करत राज्यात पुन्हा सत्ता स्थापण्याची संधी आहे, जोमाने कामाला लागा, असे भाजप कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितले.
भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विजयी संकल्प मेळाव्याचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. यावेळी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. साताराच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये दाखल झालेले उदयनराजे भोसले मात्र यावेळी उपस्थित नव्हते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळच फोडला असल्याचे भाजप नेत्यांनी यावेळी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे खासदार, आमदार तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले हर्षवर्धन पाटील, रणजीतसिंह मोहिते पाटील हे नेते देखील व्यासपीठावर उपस्थित होते.
हेही वाचा -काळा चष्मा काढल्यानंतर त्यांना त्यांची काळी बाजू दिसायला लागली; अजित पवारांची पिचडांवर टीका
खरी लोकशाही केवळ भाजपमध्ये
दरम्यान, या मेळाव्याच्या माध्यमातून नड्डा यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला. देशात २३०० राजकीय पक्ष आहेत, त्यातील ७ राष्ट्रीय तर ६९ राज्य पातळीवरील पक्ष आहेत. या सगळ्यांत खरी लोकशाही केवळ भाजपमध्ये आहे. इतर पक्ष व्यक्तीनिष्ठ अथवा कौटुंबिक पक्ष आहेत, असे नड्डा यावेळी म्हणाले.