पुणे- पोलिसांनी काही दिवसांपूर्वी वाहतुकीच्या नियमांचे सर्वाधिक उल्लंघन करणाऱ्या शंभर वाहनचालकांची यादी जाहीर केली होती. यामध्ये सर्वाधिक 108 वेळा नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाचाही समावेश होता. या दुचाकी चालकाकडून अखेर 42 हजार 300 रुपयांच्या दंडाची तडजोड रक्कम वसूल करण्यात आली आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पुणे वाहतूक पोलिसांची सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर आहे. 12 फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने नियमांचे उल्लंघन केलेल्या 100 वाहनचालकांची यादी जाहीर केली होती. या वाहनचालकांनी दंडाची रक्कम भरण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते.
त्यानंतर वाहतूक शाखेने या वाहनचालकांचा शोध घेऊन त्यांच्यावरील अनपेड चलन पेड करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आज एका दुचाकी मोपेड चालकाने सर्वाधिक 108 वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले होते. त्यांच्याकडून तब्बल 42 हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 24 फेब्रुवारी रोजी 10 वाहनचालकांनी 1 लाख 29 हजार 900 रुपये दंड भरला आहे़. त्यात 65 वेळा नियमभंग केलेल्या एका चारचाकी धारकाने 13 हजार 200 रुपयांचा दंड भरला आहे.
ज्या वाहनचालकांनी जास्तीत जास्त वाहतूक नियमांचा भंग केला आहे आणि दंड भरलेला नाही, त्यांच्या राहत्या घराच्या पत्यांवर पोलीस जाऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करतील, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा -बांगलादेशी नागरिक प्रकरण: पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल