पुणे- पिंपरी-चिंचवड परिसरातील दुचाकी चोरी करणाऱ्या दोन गुन्हेगारांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून ५ लाख १५ हजार किंमतीच्या १५ दुचाक्या जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर पोलिसांना या प्रकरणातून दुचाकी चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
हिंजवडी पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्यांना केले गजाआड; १५ दुचाकी जप्त - Hinjewadi Police
आरोपी शहर परिसरातील पार्किंग आणि रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या दुचाकी चोरायचे. मात्र, हिंजवडी पोलिसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक केल्यानंतर अधिक तपास केला असता पोलिसांना त्यांच्याकडे ५ लाख १५ हजार रुपये किंमतीच्या तब्बल १५ दुचाकी मिळाल्या.
आमिन महेबूब शेख (वय २२ रा. पिंपळे निलख) आणि रियाझ सिकंदर शेख (वय २२ रा.खाटपवाडी ता.मुळशी जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रियाझ आणि आमिन शहर परिसरातील पार्किंग आणि रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या दुचाकी चोरायचे. अटक केल्यानंतर अधिक तपास केला असता पोलिसांना त्यांच्याकडे ५ लाख १५ हजार रुपये किंमतीच्या १५ दुचाकी मिळाल्या आहेत. तसेच या प्रकरणातून पोलिसांना भोसरी-०१, हिंजवडी-०५, चतुरश्रिंगी-०२ आणि चिंचवड पोलीस ठाण्यातील ०१ अशी एकून ९ गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे. संबंधित कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, गुन्हे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक गायकवाड, किरण पवार, महेश वायबसे, कुणाल शिंदे, अतिक शेख, हनुमंत कुंभार यांनी केली आहे.