पुणे - तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एका २३ वर्षीय तरुणीला अटक केली आहे. उषा बाळू सरोगदे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तिने भोसरीमध्ये राहणाऱ्या भरत कृष्णा तळपे याला लग्नास नकार दिला होता. या कारणाने भरतने 31 जुलै रोजी चिट्टी लिहित आत्महत्या केली होती. भरतने त्या चिट्टीत उषाने दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी उषा आणि मृत भरत हे दोघे एका खासगी कंपनीत कामाला होते. त्यांचा विवाह ठरला होता. जानेवारी महिन्यात झालेल्या कार्यक्रमात 2 मे ही लग्नाची तारीख काढण्यात आली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे तारीख पुढे ढकलली जात होती. यादरम्यान, दोघांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले आणि याच कारणावरून आरोपी उषाने भरतसोबत लग्न करण्यास नकार दिला.
भरतने अनेक वेळा उषाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. ठरलेले लग्न तिने मोडले, याच कारणावरून मानसिक त्रासातून भरतने 31 जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी भरतच्या वडिलांनी भोसरी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपी उषाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे करत आहेत.