पुणे- पिंपरी-चिंचवडमधून कोरोनाग्रस्ताने रुग्णालयातून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याला काही तासांनी फिल्मीस्टाईल पकडण्यात भोसरी पोलिसांना आणि डॉक्टरांना यश आले आहे. पलायन केल्यानंतर संबंधित रुग्ण हा मित्राला भेटला होता, असे ही पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे मित्राची कोरोना विषाणूची चाचणी केली असता, तो बाधित नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही घटना शनिवारी (दि. 14 मार्च) घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. कोरोना बाधित रुग्णाला पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थायलंड येथून आलेला व्यक्तीला भोसरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. डॉक्टर फॉर्म भरून घेत असताना संबंधित रुग्णाला आपण कोरोना बाधित असल्याचे समजले. रुग्ण घाबरला होता, त्यामुळे रुग्णाने डॉक्टरांची नजर चुकवून त्या ठिकाणाहून पलायन केले. घटनेनंतर डॉक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यांची धावपळ झाली. याची माहिती भोसरी पोलिसांना देण्यात आली. तेव्हा, वरिष्ठ अधिकारी राम जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे आणि पोलीस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे यांनी कर्मचाऱ्यांसह तपास सुरू ठेवला.