पुणे-अॅक्सिस बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना भोसरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून कोयते, तलवार, मिर्चीपूड, तोंडाला लावायचे मास्क आणि दोन मोपेड दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
प्रवीण भगवान पवार (वय ३५, रा. म्हाडा सोसायटी वारजे माळवाडी), राजू आरमोघम पिल्ले (वय ३९), संतोष जनार्धन बोबडे (वय-३६), मुज्जू मेहबूब शेख (वय २५, रा. तिघे ही बोपोडी), पुष्कर किशोर मालू (वय २३, रा. औंध रोड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी प्रवीण पवार हा महाकाली टोळीच्या प्रमुखाचा भाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री पाच व्यक्ती दोन मोपेड दुचाकीवर बोपोडी कडून दापोडीकडे येणाऱ्या रस्त्यावरील बौद्धविहार येथे संशयिरित्या थांबले असल्याची गुप्त माहिती भोसरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे हे त्यांच्या पथकासह त्याठिकाणी गेले. आरोपींना याची चाहूल लागताच त्यांनी अंधाराचा फायदा घेऊन पोबारा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भोसरी पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
आरोपींकडे कोयता, तलवार, तोंडाला लावायचे मास्क, मिरची पूड आदी साहित्य मिळाले आहे. ते दापोडी येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. दरोडा टाकण्याच्या अगोदरच त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर आर्म्स अॅक्ट आणि दरोडा विषयक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांच्या पथकाने केली आहे.