पुणे- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जाहीर होताच अनेक इच्छुक आमदारांमध्ये आता नाराजी पसरली आहे. पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभेचे काँग्रेसचे आमदार असलेले संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज आहेत. संग्राम थोपटे यांचे नाव मंत्र्यांच्या यादीत नसल्याची माहिती मिळताच भोर शहरात नाराज थोपटे समर्थकांनी काँग्रेसचा फ्लेक्स जाळला आहे.
भोरमधील थोपटे हे काँग्रेसमधील निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. पुणे जिल्ह्यात काँग्रेस गेल्या काही काळात अस्तित्वहीन झालेली असताना, भोरमध्ये संग्राम थोपटे सलग तीनवेळा आमदार झाले. तर, त्यापूर्वी सलग पाच टर्म संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे आमदार होते. त्यामुळे या मंत्रिमंडळात संग्राम थोपटे यांचा समावेश नक्की होणार, अशी जोरदार चर्चा होती.
दरम्यान, मंत्रिमंडळात समावेश होईलच अशी अपेक्षा संग्राम थोपटेही ठेवून होते. मात्र, त्यांच्या नावाचा विचार न झाल्याने भोरमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. संग्राम थोपटेंना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भोर नगरपालिकेच्या काँग्रेसच्या 20 नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. भोर नगरपालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. यात 20 पैकी 20 नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच भोर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या सर्व बातम्या -