पुणे- आज श्रावण मासातील दुसरा सोमवार आहे. सह्याद्रीच्या कुशीतील वसलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकरला रविवारपासूनच भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. आज सकाळी पहाटेची आरती झाल्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आहे. पांढऱ्याशुभ्र धुक्यात वेढलेला हा परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला आहे. यावेळी दीड ते दोन लाख भाविकांनी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आहे.
भीमाशंकर येथे येण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर व मंचर अशा दोन मार्गाने भाविक येत असतात. आज दुसऱ्या सोमवारी भाविकांची गर्दी असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मंदिराच्या मागेच निघडाळे, तेरंगण फाटा व वनविभागाच्या हद्दीत पार्किंग करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांना पाच ते सात किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागत आहे, यावेळी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.