महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फेसबुकवरून पैशांची मागणी होतेय तर सावधान! पिंपरीत 8 तक्रारी दाखल

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावे  गेल्या आठवड्यात बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्याचे प्रकरण समोर आले होते. तसेच त्या अकाऊंटवरून युझर्सकडे दहा हजार रुपयांची मागणी देखील करण्यात आली होती.

Filed 8 complaints in Pimpri
पिंपरीत 8 तक्रारी दाखल

By

Published : Oct 30, 2020, 12:35 PM IST

पिंपरी (पुणे) - पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावे गेल्या आठवड्यात बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्याचे प्रकरण समोर आले होते. तसेच त्या अकाऊंटवरून युझर्सकडे दहा हजार रुपयांची मागणी देखील करण्यात आली होती. आता आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले असून युझर्सकडे पैशांची मागणी केली आहे.

सध्या शहरातून बनावट फेसबुक अकाऊंटबाबत आठ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिली आहे.

सुधाकर काटे- सायबर क्राईम वरिष्ठ पोलीस निरीक्षक

खात्री न करता ऑनलाइन पैसे होतात ट्रान्सफर

गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक व्यक्तींच्या नावे त्यांचे फोटो वापरून बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले जात आहेत. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या फेसबुक मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. काही तासांनी मित्रांना मेसेंजरद्वारे पैश्यांची मागणी केली जाते. अनकेदा खात्री न करता ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केले जातात. आर्थिक फसवणुकीचा हा एक नवा मार्ग आता चोरट्यांनी शोधला आहे.

मात्र, अशा प्रकरणात पोलिसांचे देखील बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले असल्याचे समोर आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यानंतर एका पोलीस उपनिरीक्षकाचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून युझर्सकडे पैसे मागितल्याचे समोर आले आहे. मात्र, वेळीच ही बाब त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आपल्या मित्रांना बनावट अकाऊंटची माहिती दिली.

फेसबुकला प्राव्हेट करा

सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे म्हणाले की, बनावट फेसबुक अकाऊंटच्या आठ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यांचा तपास सुरू आहे. जेवढ्या तक्रारी आल्या आहेत, त्या तक्रारदारांनी युझर्सला पैसे दिलेले नाहीत. मात्र त्यांच्याकडे पैसे मागितले गेले आहेत. फेसबुक वापरणाऱ्या व्यक्तींनी फेसबुकला प्रायव्हेट करावे. त्यामुळे आपले प्रोफाइल कुणाला वापरता येत नाही किंवा फोटो डाऊनलोड करता येत नाही.

आपल्या प्रोफाइलवरील फोटो डाऊनलोड करून अज्ञात व्यक्ती बनावट फेसबुक अकाऊंट तयार करतात. आपल्या मित्रांना ते अकाऊंट खरे वाटते. अशावेळी कोणी पैसे मागत असेल तर, खात्री करावी. पैशांची गरज असेल तर, आपल्या मित्राकडे आपला मोबाईल नंबर आहे. तो कॉल करून पैसे मागू शकतो, फेसबुकच्या माध्यमातून का मागेल? यावर विचार केला पाहिजे. अशा प्रकरणात पैसे देऊ नयेत. असे आवाहन पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details