पुणे - १ एप्रिलच्या मुहूर्तावर अनेक जण इतरांची मजा घेण्यासाठी वेगवेगळे खोटे मेसेज पाठवत असतात. मात्र, यावर्षी अशी मजा करणाऱ्यांना ही चेष्टा महागात पडणार आहे. सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. अशा काळात एप्रिल फुल करण्यासाठी काही जण समाज माध्यमांवर खोटे मेसेज पसरवून नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याची शक्यता आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सोशल मिडियावर करडी नजर ठेवली जाणार आहे. गैरसमज निर्माण होतील असे, मेसेज पाठवणाऱ्यांसह ग्रुप अॅडमिनवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी याबाबत माहिती दिली.
यावर्षी नेटकऱ्यांना एप्रिल फुल पडणार महागात!
१ एप्रिलला अनेक जण आपला मित्र परिवार, नातेवाईकांना एप्रिलफुल करत असतात. अशा काळात एप्रिल फुल करण्यासाठी काही जण समाज माध्यमांवर कोरोनाबाबत खोटे मेसेज पसरवून नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याची शक्यता आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सोशल मीडियावर करडी नजर ठेवली जाणार आहे.
सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. बारामतीत कोरोनाचा एक रुग्ण आढळल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. १ एप्रिल रोजी अनेक जण आपला मित्र परिवार, नातेवाईकांना एप्रिलफुल करत असतात. त्यातून एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळत असतो. मात्र, सद्यस्थितीत कोरोना विषाणूचे संकट असून संचारबंदी लागू आहे. त्यामुळे कोणीही कोराना संदर्भात कोणत्याही प्रकारे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशा प्रकारचे मेसेज सोशल मिडियाच्या माध्यमातून टाकू नये अथवा ते व्हायरल करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. असे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे.