महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 17, 2021, 4:13 PM IST

Updated : Apr 17, 2021, 10:44 PM IST

ETV Bharat / state

बारामतीत बनावट रेमडेसिवीर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बारामतीत बनावट रेमडेसिवीर विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ही टोळी 35 हजार रुपयांना औषध विक्री करत होती.

baramati-police-expose-fake-remedesivir-selling-gang
बारामती

बारामती -कोरोना संक्रमित रुग्णांना संजीवनी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटलीत लिक्विड ओतून त्याची ३५ हजार रुपयांना विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. बारामती तालुका पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

प्रतिक्रिया

सध्या सर्वत्र रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. या काळात रुग्णसेवेसाठी अनेकजण झटत आहेत. मात्र, दुसरीकडे काहीजण कोरोना आपत्तीचा गैरफायदा घेत मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार बारामतीत केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटलीत लिक्विड ओतून हजारो रुपयांना विक्री करणाऱ्या या टोळीला तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनचे निरिक्षक विजय नगरे यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मुख्य सुत्रधार दिलीप ज्ञानदेव गायकवाड (वय ३५, रा. काटेवाडी, ता. बारामती) याच्यासह प्रशांत सिध्देश्वर घरत (वय २३, रा. भवानीनगर, ता. इंदापूर), संदिप संजय गायकवाड (रा. काटेवाडी, ता. बारामती), शंकर दादा भिसे (वय २२, रा. काटेवाडी, ता. बारामती) यांना बारामती ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

विविध कलमान्वये गुन्हा दाखल -

आरोपींवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमन कायदा, औषधे व सौदर्यप्रसाधने कायदा, औषध किंमत नियंत्रण कायद्यन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईबद्दल ग्रामीण पोलिस अधिक्षकांच्या वतीने बारामती ग्रामीण पोलिस ठाण्याला २५ हजाराचे बक्षिस जाहिर करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये पोलिस निरिक्षक महेश ढवाण, हवालदार आर. जे. जाधव, आर. एस. भोसले, डी. एन. दराडे, निखिल जाधव आदींनी सहभाग घेतला.

प्रकार असा आला उघडकीस-

बारामतीतील एका कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकाला रेमडेसिवीरची तातडीची गरज असल्याने त्याने या टोळीतील एकाशी संपर्क साधला. तो बारामतीतील एका कोविड सेंटरमध्ये काम करतो. त्याच्याकडे इंजेक्शन असल्याची माहिती गरजूला मिळाली होती. त्यानुसार इंजेक्शन देणाऱ्याने त्याला शहरातील फलटण चौकात येण्यास सांगितले. एका इंजेक्शनचे ३५ हजार असे दोन इंजेक्शनचे ७० हजार द्यावे लागतील, अशी मागणी केली. पोलिसांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी वाहनांसह या टोळीतील काहींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली. सेंटरमधील रिकाम्या झालेल्या रेमडेसीवीरच्या बाटल्यांमध्ये लिक्विड भरत ते फेविक्विकने व्यवस्थित पॅक करत हे बनावट औषध तयार करून ते विकले जात होते. रुग्णांच्या जीवाशी त्यातून खेळ केला जात होता.

Last Updated : Apr 17, 2021, 10:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details