बारामती (पुणे) - चित्रपटाला शोभेल असाच चित्त थरारक पाठलाग करत बारामती पोलिसांनी जिवाची बाजी लावून ट्रक चोरट्याला मोठ्या शिताफीने पकडले. काल रात्री दहा ते बारा दरम्यान तब्बल दोन तास बारामती पुणे रस्त्यावर हा थरार सुरू होता.
चोरट्याला ट्रक थाबवण्यासाठी सांगताना पोलीस हेही वाचा -५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी छोटा राजनच्या पुतणीला अटक
बारामतीतील तांदळवाडी हद्दीतून काल रात्री दहाच्या सुमारास ट्रक (एम.एच ४२ ए.जी ३६००) चोरीला गेल्याची माहिती ट्रक मालक अमोल गुरव यांनी बारामती तालुका पोलिसांना दिली होती. चोरून नेलेल्या ट्रकला जीपीएस यंत्रणा असल्यामुळे सदर ट्रक बारामती तालुक्यातील मेडद येथे असल्याचे समजले. त्यानुसार पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तात्काळ पोलीस कर्मचारी विजय वाघमोडे, नंदू जाधव, शशिकांत दळवी यांना ट्रकचा पाठलाग करण्याच्या सूचना दिल्या.
पोलीस ट्रकचा पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यावरून ट्रक चोर बाबा नजीरकर हा अतिवेगाने ट्रक चालवू लागला. दरम्यान, पोलीस जीप चालक अनिकेत शेळके यांनी आपले कौशल्य दाखवत ट्रकचा पाठलाग केला. मोरगाव येथे एक पिकप गाडी रस्त्यावर आडवी लावून नाकाबंदी करण्यात आली होती. मात्र, ट्रकचालकाने आडवा लावलेला पिकप उडवला व जेजुरीच्या रस्त्याने ट्रक नेला. पुन्हा जेजुरीत कंटेनर आडवा लावून नाकाबंदी करण्यात आली. मात्र, तरीसुद्धा ट्रक चालकाने ट्रक कंटेनरच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेतून दुकानात घुसवून सासवडच्या दिशेने दामटला. घटनेचे गांभीर्य ओळखून ढवाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.
काही केल्या ट्रक चालक ट्रक थांबवत नसल्याने ट्रकच्या टायरवर गोळी मारून पोलीस ट्रक थांबवण्याचा विचार करत होते. मात्र, सासवडच्या अलिकडेच एका अरुंद पुलानजिक ट्रकचा वेग कमी झाला. ही संधी पाहून धाडसी पोलीस कर्मचारी विजय वाघमोडे हे ट्रकच्या केबिनमध्ये घुसले. पोलीस केबिनमध्ये आल्याचे पाहून ट्रक चालकाने ट्रक बाहेर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले.
हेही वाचा -पुण्यात सलग दुसऱ्या दिवशीही लसीकरण बंद; नागरिक हवालदिल