बारामती -बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रतिदिन केवळ पंचवीसच लहान-मोठ्या वाहनांना योग्यता प्रमाणपत्र दिले जात आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत असून, बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यातून येणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता वाहन तपासणीचा कोठा वाढवण्याची मागणी वाहन मालकांकडून होत आहे.
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रांची तपासणी करण्याची ऑनलाईन अपॉइंटमेंट ३० दिवसांच्या नंतरची मिळत आहे. शिवाय ऑनलाइन अपॉइंटमेंट सकाळी ८ वाजता सुरू होऊन ८ वाजून २ मिनिटांमध्ये १ दिवसाचा कोठा म्हणजेच २५ वाहन तपासणीचा कोठा संपत आहे. अवघ्या दोनच मिनिटात कोठा संपत असल्याने वाहन तपासणीचा कोठा वाढवण्याची मागणी वाहन मालकांकडून केली जात आहे. बारामती, दौंड, इंदापूर या तीन तालुक्यांसाठी २५ अपॉइंटमेंट असतात. त्यामध्ये तीन चाकी, प्रवासी रिक्षा, हलकी व मध्यम वाहने, टँकर व जड वाहने अशा प्रकारच्या सर्व वाहनांसाठी वेगवेगळा कोठा आहे. या सर्वांमधून ऑनलाईन अपॉईंटमेंट मिळणे मुश्कील असून, वाहन मालकांची शेकडो वाहने दोन-दोन महिने एकाच जागेवर उभी आहेत. त्यामुळे वाहन मालकांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे.