बारामती -राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नामुळे इंदापूर तालूक्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर उजनी जलाशयामध्ये येणाऱ्या पाण्यापैकी 5 टीएमसी सांडपाणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे पडसाद वालचंदनगरमध्ये उमटले. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वालचंदनगर बस स्थानकासमोर जिल्हा परिषद सदस्य प्रतापआबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कोरोना काळातील फिजिकल डिस्टन्सिंग पाळून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
काय म्हणाले आंदोलनकर्ते -
इंदापूर हा खासदार सुप्रिया सुळे यांचा हक्काचा मतदारसंघ असल्याने त्यांना विनंती आहे की, त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निर्णयाचा फेरविचार करून इंदापूरच्या शेतकरी वर्गाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी रविराज खरात यांनी केली. दरम्यान, जर इंदापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला हक्काचे पाणी मिळाले नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळीग्रामपंचायत सदस्य अरूण वीर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.