बारामती - पुणे जिल्ह्यातील बारामतीतही कोरोनाने हाहाकार केला आहे. कोरोनामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यासंदर्भाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आज (6 मे) खासदार सुप्रिया सुळे यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीत लसीकरण, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स व औषधांची उपलब्धता आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.
बारामती लोकसभा मतदारसंघाबरोबरच पुणे जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर केंद्रांची सध्याची स्थिती काय आहे? तेथे उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या, त्यांना मिळत असलेले उपचार आणि अन्य सुविधा, खाटांची उपलब्धता, ऑक्सिजनची सध्यस्थिती, रेमडेसिवीर आदी बाबींवर यावेळी सुप्रिया सुळे यांनी चर्चा केली.
सुप्रिया सुळेंच्या सूचना
तसेच, 'जिल्ह्यात सुरू असलेली लसीकरण केंद्रे, त्याठिकाणी होत असलेली गर्दी पाहून योग्य नियोजन करा. त्यासाठी लाभार्थ्यांची आगाऊ नोंदणी करा. जादा गर्दी होऊ देऊ नका. केंद्रांवर येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची योग्य काळजी घ्या', अशा सूचनाही यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिल्या.