पुणे -माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आज(सोमवार) सकाळी ९ वाजता मतमोजणी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र जयश्री गार्डन येथे ठेवण्यात आलेल्या मतपेट्या बदलण्यात आल्या असल्याचा आरोप तावरे गटाने केला. त्यामुळे मतमोजणीला तब्बल दीड तास उशीर झाला आहे. दरम्यान संबधित दोन्ही गटांना प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज दाखविले आणि त्यानंतर मतमोजणीस सुरुवात झाली आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी मतदान रविवारी घेण्यात आले आहे. यामध्ये प्रथम सर्वाधिक ९१.५५ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, मतदानाचा टक्का वाढला आणि मोजणीस्थळी काही फेरबदल झाल्याच्या अफवा पसरल्याने काही काळ गोंधळाची स्थिति निर्माण झाली होती. मात्र, तावरे गटाने स्ट्राँगरूम मधील सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने फुटेज दाखविल्याने वातावरण शांत झाले आहे. मात्र, या प्रकारामुळे तब्बल दीड तास मतमोजणी थांबली होती. तर, दोन्ही गटांनी संमती दर्शविल्याने मत मोजणी सुरू झाली आहे.