पुणे (बारामती) - कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बारामती नगरपरिषदेने आता शहरातील प्रत्येक नागरिकाची प्राथमिक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी १० प्रभागातील १४ हजाराहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव व ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी याबाबत माहिती दिली.
बारामतीत प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी केली जाणार आहे शहरातील सव्वा लाखाहून अधिक नागरिकांची तपासणी होणार -शहरातील सव्वा लाखाहून अधिक नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. ज्या नागरिकांना थंडी, ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे यासारखी लक्षणे असतील त्यांचे तातडीने स्वॅब घेऊन तपासणी केली जात आहे. ज्या प्रभागातून २५ पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. त्याठिकाणी सुरुवातीला लक्ष केंद्रित केले गेले आहे. एका प्रभागात २० टीम कार्यान्वित करून प्रत्येक टीममध्ये किमान २ जण अशा पद्धतीने तपासणी केली जात आहे. काल(शुक्रवारी) एकाच दिवशी १८० टीमच्या माध्यमातून तपासणी केली गेली. क्षेत्रीय अधिकारी, आशा वर्कर व सामाजिक कार्यकर्ते अशा ६०० जणांनी काल एकाच वेळेस तपासणी कार्यक्रम राबवला.
शहरात निर्जंतुकीकरण मोहीम सुरू -दरम्यान उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी स्वतः कॉन्टॅक्ट ट्रेसिंगबाबत प्रशिक्षण घेतले. शुक्रवारपासून बारामती शहरात निर्जंतुकीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरात अनेक ठिकाणी फवारणी सुरू आहे. पुढील तीन दिवसात शहरात फवारणी पूर्ण होईल, असे मुख्य अधिकारी किरणराज यादव यांनी सांगितले. या तपासणीमध्ये एखादा नागरीक हायरिस्कमधील वाटल्यास त्याला रूग्णवाहिकेतून दवाखान्यात नेले जात आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात अशा १५ जणांना तपासणीसाठी पाठवले गेले. जे घरी उपचार घेत असून अद्याप कोरोना निगेटिव्ह झालेले नाहीत, अशा सर्वांना आता रूग्णालयात पाठवले जाणार आहे.